छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महिलांना भूतबाधा झाल्याचा बनाव रचून महिलांना छळणार्या भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मिसारवाडीत ही कारवाई करण्यात आली. एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पती, दीर, सासू आणि या भोंदूबाबाविरुद्ध ४ एप्रिल रोजी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदू बाबा आणि महिलेचा दीर या दोघांना अटक केली आहे. पती आणि सासूने पोबारा केला. अटकेतील दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वीसवर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. वर्षभरापूर्वी तिचा इरफानसोबत विवाह झाला. ती सासू, सासरा, दीर, भावजय आदींसोबत किराडपुरा भागात राहते. २८ मार्चला सायंकाळी ५ वाजता पतीसह सासू व दीर यांनी तिला ’तुझे नवीन आधारकार्ड बनवायचे आहे’ असे खोटे सांगून तिला बाहेर नेले. ते तिला घेऊन मिसारवाडी रोडवरील वैशाली ढाब्याजवळील एका दर्गात घेऊन गेले. पीडितेने ’येथे का आणले?’ असे विचारले असता, सासूने ’तुला भूतबाधा झाली आहे, त्यासाठी आलो आहोत’ असे सांगितले. तिथे अश्पाक बाबाने औषधाचा वास दिला, अगरबत्ती लावली आणि तो काहीतरी मंत्र म्हणू लागला. सासूने तिचे केस मोकळे सोडले. तिला हाताचापटाने मारहाण केली आणि बळजबरीने अंगात आल्यासारखे करण्यासाठी दबाव टाकला. मात्र त्यानंतर पुढे काय झाले हे पीडितेला आठवत नाही. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.














